
३४.९५ कोटींच्या निधीला शासनाची प्रशासकीय मान्यता; प्रलंबित कामांचा मार्ग मोकळा!!
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील काकडी येथील श्री साईबाबा शिर्डी विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार आशुतोष काळे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केलेले प्रश्न आणि शासनदरबारी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. महायुती शासनाने विमानतळाच्या विविध विकासकामांसाठी तब्बल ३४ कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे विमानतळावरील प्रलंबित विकासकामांना गती मिळणार असून देश-विदेशातून येणाऱ्या साईभक्तांसह प्रवाशांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिर्डी हे देश-विदेशातील लाखो साईभक्तांचे श्रद्धास्थान असल्यामुळे येथे वर्षभर भाविकांची मोठी वर्दळ असते. साईभक्तांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुखकर व्हावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या काकडी येथील शिर्डी विमानतळावर प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता विमानतळावर आवश्यक पायाभूत सुविधा आणि प्रवाशांना पूरक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन आ.आशुतोष काळे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात विमानतळाच्या विकासासंदर्भात प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.
विमानतळाच्या विकासासाठी केलेल्या या पाठपुराव्याची शासनाने दखल घेत ३४ कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे रखडलेल्या विकासकामांचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार असून विमानतळाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होऊन प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत. विमानतळाच्या सुविधांमध्ये वाढ होवून भविष्यात विमानसेवेला चालना मिळण्यासोबतच शिर्डीला येणाऱ्या देश-विदेशातील साईभक्तांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. त्याचा सकारात्मक परिणाम काकडीसह कोपरगाव आणि परिसरातील गावांच्या व्यापार, व्यवसाय व आर्थिक उलाढालीवर होणार आहे.
शिर्डीला भेट देणाऱ्या साईभक्तांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि विमानतळाचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.सुनेत्राताई पवार आणि उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे आभार मानले आहेत.


