Saturday, November 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोपरगावच्या जलसंधारणाच्या सर्व प्रस्तावांना मंजुरी देणार;मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची...

कोपरगावच्या जलसंधारणाच्या सर्व प्रस्तावांना मंजुरी देणार;मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची आ. आशुतोष काळेंना ग्वाही!!

दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी २५ हजार कोटींची तरतूद!!

कोपरगाव प्रतिनिधी

चालू वर्षी एल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील ३५० तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जलसंधारणाच्या सर्व प्रस्तावांना मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांनी आमदार आशुतोष काळे यांना दिली.
राज्यात सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरू असताना ना. संजय राठोड यांनी थेट उसाच्या फडात जावून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर वास्तव्यास असलेल्या ऊसतोडणी कामगारांच्या तांड्यावर जाऊन शेकडो ऊसतोडणी कामगारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले की,माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांनी सहकाराच्या माध्यमातून उभारलेल्या संस्था तळहाताच्या फोडाप्रमाणे जपल्या. त्यांच्या दूरदृष्टीतून उभारलेला प्रतिदिन ८०० मे. टन गाळप क्षमतेचा साखर कारखाना माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ६ हजार मे. टन गाळप क्षमतेपर्यंत पोहोचला आहे. कर्मवीरांचे विचार आणि कार्याचा वारसा पुढे नेताना मी व माझे संचालक मंडळ कारखान्याच्या प्रगतीबरोबरच कारखाना कर्मचाऱ्यांसह ऊसतोडणी कामगारांचीही काळजी घेत आहोत.
दिवाळीसारख्या सणाच्या काळात कुटुंबापासून दूर राहून ऊसतोडणी कामगार आपल्या घामातून साखर कारखानदारीला बळ देत असतात. अशा कामगारांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी मंत्री संजय राठोड यांनी थेट उसाच्या फडात जाऊन दिवाळी साजरी केली, ही निश्चितच कौतुकास्पद आणि संवेदनशील बाब आहे. त्यांच्या या कृतीचा मनस्वी आनंद व अभिमान वाटतो, असे आमदार काळे यांनी सांगितले.दरम्यान, कोपरगाव मतदारसंघात दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जलसंधारण विभागाकडे विविध प्रस्ताव सादर केले असून, त्यांना तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी ना. संजय राठोड यांच्याकडे केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना ना. संजय राठोड म्हणाले की, दुष्काळावर मात करण्यासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार,नाले खोलीकरण,पाणीपुरवठा प्रकल्पांमधील गाळ काढणे तसेच पाणी साठवणुकीच्या नवीन व्यवस्था निर्माण करण्यावर शासनाचा भर आहे. पाणी अडविणे आणि जिरविण्याबरोबरच रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ही कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार आहेत. पाणीपुरवठ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जलसंधारण विभागाचे २५ हजार कोटी खर्चाचे नियोजन असून, केंद्र शासनाकडूनही मोठ्या प्रमाणात मदत मिळणार आहे. त्यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघासाठी सादर केलेल्या जलसंधारणाच्या सर्व प्रस्तावांना मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देणे ही माझी जबाबदारी आहे, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांच्या हस्ते ऊसतोडणी कामगारांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात आला.याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिनार कुदळे, संचालक सूर्यभान कोळपे, डॉ.मच्छिंद्र बर्डे, पद्मविभूषण शरदचंद्र पवार पतसंस्थेचे संचालक ज्ञानेश्वर हाळनोर, सुनील कोळपे, अंबादास धनगर, कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, सेक्रेटरी बी. बी. सय्यद, असिस्टंट सेक्रेटरी संदीप शिरसाठ आदींसह कारखान्याचे अधिकारी व ऊसतोडणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनापासून काळे कुटुंबाशी ऋणानुबंध मी साईबाबांचा भक्त असून १९९९ पासून नियमितपणे शिर्डीला दर्शनासाठी येत आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांच्यासोबतही काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या कार्यकाळात शिर्डीला दर्शनासाठी आल्यानंतर प्रत्येक वेळी त्यांनी शासकीय निवासस्थानी माझ्या राहण्याची व्यवस्था केली. त्यावेळी त्यांच्यासोबत विधिमंडळात काम केले असून आता आमदार आशुतोष काळे यांच्यासोबतही काम करण्याची संधी मिळत आहे. काळे कुटुंबाशी माझे जुने ऋणानुबंध आहेत, अशी भावना ना.संजय राठोड यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!