
कोपरगाव प्रतिनिधी
तालुक्यातील तळेगाव मळे येथील जिल्हा परिषद शाळेत झालेल्या चोरीच्या घटनेचा कोपरगाव तालुका पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४७ हजार रुपये किमतीचे १० सॅमसंग टॅब आणि लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप हस्तगत करण्यात आला आहे. गोपनीय बातमीदारांची माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
तळेगाव मळे येथील जिल्हा परिषद शाळेत ९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी खिडकीची काच फोडून शाळेत प्रवेश केला होता. चोरट्यांनी ४० हजार रुपये किमतीचे १० सॅमसंग टॅब, ७ हजार रुपये किमतीचा लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप आणि ४ हजार रुपये किमतीचा रेडमी १५ ए 5G मोबाईल, असा एकूण ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी शिक्षक सुनील कारभारी ढेपले (वय ५५, रा. सवंतसर, ता. कोपरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. यामध्ये सागर सोमनाथ झांगे (वय २२, रा. झांगे वस्ती, वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि अमोल आजीनाथ वैद्य (वय २३, रा. तळेगाव मळे, ता. कोपरगाव) यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांना तळेगाव मळे शिवारातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींकडून चोरीस गेलेले १० सॅमसंग टॅब आणि लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप, असा एकूण ४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना ४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८.५८ वाजता अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. उर्वरित मुद्देमाल आणि अन्य गुन्ह्यांच्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोना रघुनाथ कारखले, पोको अंबादास वाघ, पोको नवनाथ गुंजाळ, पोको जयदिप गवारे, पोको राम खरातोडे, पोको रशिद शेख तसेच श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोहेकॉ सचिन धनाड यांनी सहभाग घेतला.


