
कोपरगाव प्रतिनिधी
रांजणगाव देशमुख परिसरातील शेती आणि गावांच्या पाणीप्रश्नाला दिलासा मिळावा, तसेच परिसरातील के.टी. वेअर व माती बंधारे पाण्याने भरता यावेत, यासाठी निळवंडे कालव्याच्या पाणी वितरण व्यवस्थेत आवश्यक बदल करण्याची मागणी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी निळवंडे कालव्याचे कार्यकारी अभियंता श्री. शेख यांच्याशी चर्चा करून अंजनापूर म्हसोबा मंदिराजवळ, जवळके हायस्कूलच्या मागील बाजूस आणखी व्हॉल्व काढण्याची सूचना केली.सध्या रांजणगाव देशमुखजवळ निळवंडे कॅनॉलवरून बंधारे भरण्यासाठी एक व्हॉल्व काढण्यात आलेला आहे. मात्र, या एकाच व्हॉल्वद्वारे अंजनापूर, धोंडेवाडी, जवळके आणि बहादराबाद या गावांमधील सर्व के.टी. वेअर तसेच माती बंधारे भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन होण्याबरोबरच प्रत्येक गावातील बंधाऱ्यांपर्यंत पाणी पोहोचणे आवश्यक आहे.यासाठी अंजनापूर येथील म्हसोबा मंदिराजवळ, जवळके हायस्कूलच्या मागील बाजूस स्वतंत्र व्हॉल्वची व्यवस्था केल्यास पाणी वितरण अधिक सुलभ होईल. परिणामी, संबंधित गावांमधील बंधारे भरण्यास मदत होऊन पाण्याचा साठा वाढेल. त्याचा लाभ परिसरातील शेतकरी, पशुधन आणि ग्रामस्थांना होऊ शकेल. भूजलपातळी वाढण्यासही हातभार लागेल.सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग स्थानिक पातळीवर व्हावा, यासाठी नियोजनबद्ध पाणी वितरण करणे गरजेचे आहे. केवळ पाणी उपलब्ध करून देणे पुरेसे नसून ते योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने पोहोचणेही तितकेच महत्त्वाचे आहे.त्यामुळे संबंधित विभागाने या सूचनेची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि अंजनापूर म्हसोबा मंदिराजवळ दुसरा व्हॉल्व काढण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही भूमिका स्नेहलताताई कोल्हे यांनी मांडली आहे.दुष्काळाच्या स्थितीत हा निर्णय तातडीने घेणे गरजेचे असून शेतकऱ्यांना व नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे यासाठी स्नेहलताताई कोल्हे यांनी केलेल्या सूचनेनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने आम्ही पाहणी करण्यास जातो असा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.


