
निराधारांच्या रखडलेल्या मानधनासाठी दीपकराव गायकवाड यांचा आवाज; आमदार विवेक कोल्हे यांनी घेतली दखल!!
कोपरगाव प्रतिनिधी
आमदार विवेक कोल्हे यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या लोकसंवाद कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोपरगाव शहरासह विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक व वैयक्तिक समस्या जाणून घेण्यासाठी गुरुवारी या लोकसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी १२ वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू होता. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या विविध समस्या व प्रश्न मांडले. यामध्ये शेतकरी, ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सोसायट्यांचे अध्यक्ष व संचालक, महिला बचतगटांचे प्रतिनिधी, निराधार योजनेचे लाभार्थी आणि दिव्यांग नागरिकांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार महेश सावंत यांनी केले.
या लोकसंवादात जेऊर कुंभारी येथील माजी संचालक मधुकर वक्ते यांनी हरिसन ब्रँच चारीच्या पाणीप्रश्नी आक्रमक भूमिका मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले. हरिसन ब्रँच चारीला पाणी मिळण्यास नेहमीच विलंब का होतो? इतर चाऱ्यांना वेळेवर पाणी सोडले जाते; मात्र हरिसन ब्रँचच्या शेतकऱ्यांनाच पाण्यासाठी वारंवार संघर्ष का करावा लागतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हरिसन ब्रँचच्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी वारंवार इरिगेशन बंगल्यावर हेलपाटे मारावे लागतात. प्रत्येक आवर्तनासाठी संघर्ष करावा लागत असून, त्यांच्या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची खंत मधुकर वक्ते यांनी व्यक्त केली. एकेकाळी सुजलाम्-सुफलाम् असलेल्या हरिसन ब्रँच परिसराला ‘कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखले जात होते; मात्र आज पाण्याअभावी या भागाची अवस्था वाळवंटासारखी होत चालली आहे. त्यामुळे इतर चाऱ्यांप्रमाणे हरिसन ब्रँच चारीलाही आवर्तन सोडल्यानंतर तातडीने पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
तसेच जेऊर कुंभारी येथील आरपीआयचे प्रदेश सचिव दीपकराव गायकवाड यांनी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना तसेच दिव्यांग लाभार्थ्यांच्या रखडलेल्या मानधनाचा प्रश्न प्रभावीपणे मांडला. शासनाकडून पात्र लाभार्थ्यांना दरमहा १ हजार ५०० रुपये मानधन दिले जाते; मात्र अनेक महिन्यांपासून हे मानधन लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील वयोवृद्ध, निराधार आणि दिव्यांग नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
मानधनाबाबत माहिती घेण्यासाठी लाभार्थ्यांना वारंवार तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. यात त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतात. त्यामुळे लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर झाली आहेत की नाहीत, तसेच अर्जांमध्ये काही त्रुटी असल्यास त्या नेमक्या कोणत्या आहेत, याची माहिती संबंधितांना पत्राद्वारे अथवा दूरध्वनीवरून कळविण्यात यावी. त्यामुळे नागरिकांना विनाकारण तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत, अशी मागणी दीपकराव गायकवाड यांनी केली.
या प्रश्नाची आमदार विवेक कोल्हे यांनी तत्काळ दखल घेत तहसीलदार महेश सावंत यांना संबंधित प्रकरणांवर लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या गजरात आमदार विवेक कोल्हे यांच्या भूमिकेचे कौतुक केले.
लोकसंवादात दुष्काळी परिस्थिती, खरीप हंगामातील नुकसान, रब्बी हंगामासाठी पाणी, जनावरांचा चारा, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि वीजपुरवठा अशा विविध प्रश्नांवर नागरिकांनी आपली व्यथा मांडली. हरिसन ब्रँचसह गोदावरी डावा व उजव्या कालव्यांच्या आवर्तनाचा प्रश्नही यावेळी चर्चेत आला. याशिवाय निराधारांचे रखडलेले मानधन, महिलांची आर्थिक फसवणूक, शेतपंप चोरी, गावठाणासाठी जमीन, शिवरस्ते आणि विविध महसुली प्रश्नांवर नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.लोकसंवादाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आपले प्रश्न थेट लोकप्रतिनिधींसमोर मांडण्याची संधी मिळाली. मात्र, या उपक्रमाचे खरे यश नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर प्रशासन किती तत्परतेने कार्यवाही करते, यावर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी तातडीने निर्णय घेऊन शेतकरी, निराधार आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


