
जेऊर कुंभारी वार्ताहर
जेऊर कुंभारी परिसरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, आता बिबट्याने थेट गावातील मानवी वस्तीत शिरकाव केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास डॉक्टर बापु गिरमे यांच्या घरासमोरील अंगणात आलेल्या बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला केला. ही संपूर्ण घटना घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
रात्रीच्या वेळी बिबट्या थेट घराच्या अंगणात येऊन कुत्र्यावर हल्ला करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. गावातील लोकवस्तीतच बिबट्याचा वावर सुरू झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तसेच रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे, लहान मुलांना एकटे सोडणे तसेच पशुधनाची काळजी घेणे धोकादायक बनले आहे. वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा, तसेच गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे जेऊर कुंभारी परिसरात भीतीचे सावट पसरले असून, वनविभाग आता कोणती ठोस उपाययोजना करणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


