Saturday, October 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedगौतमच्या कल्याणी वावधनेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड!!

गौतमच्या कल्याणी वावधनेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड!!

कोपरगाव प्रतिनिधी

गौतम पब्लिक स्कूलने यंदाच्या शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करत क्रीडा क्षेत्रातील आपला लौकिक अधिक उंचावला आहे. चिपळूण येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत पुणे विभागाच्या मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले, तर शाळेच्या १४ व १७ वर्षांखालील दोन्ही मुलांच्या हॉकी संघांनी विभागीय स्पर्धेत विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुटावर नाव कोरले. विशेष म्हणजे, व्हॉलीबॉल संघातील कु. कल्याणी वावधने हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली असून, दोन्ही हॉकी संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. अशी माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी तसेच रत्नागिरी जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने १४ वर्षांखालील मुला-मुलींच्या राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६-२७ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पुणे विभागाच्या मुलींच्या संघाने पहिल्याच सामन्यात मुंबई विभागाचा ३-० असा सरळ सेटमध्ये पराभव करत शानदार सुरुवात केली. उपांत्य फेरीत नागपूर विभागाविरुद्ध पाच सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यातही संघाने प्रतिस्पर्ध्याला कडवी झुंज दिली; मात्र पुणे विभागाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या संघाचे नेतृत्व गौतम पब्लिक स्कूलच्या खेळाडूने केले. संघातील कु. कल्याणी वावधने हिची शिर्डी येथे दि. २३ ते २७ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.
दरम्यान, दि. २८ व २९ ऑक्टोबर रोजी गौतम पब्लिक स्कूलच्या क्रीडांगणावर झालेल्या विभागीय शालेय हॉकी स्पर्धेत शाळेच्या दोन्ही संघांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले. १४ वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात सोलापूर संघाचा ५-० गोलने, तर १७ वर्षांखालील गटात पुणे शहराच्या संघाचा ७-१ गोलने पराभव करत दोन्ही गटांत विजेतेपद मिळवले. या विजयासह दोन्ही संघांची बुलढाणा येथे दि. १२ ते १५ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली असून, ते पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मा.आ.अशोकराव काळे, विश्वस्त आमदार आशुतोष काळे, सचिव सौ.चैतालीताई काळे, संस्था इन्स्पेक्टर नारायण बारे, सर्व संस्था सदस्य आणि प्राचार्य नूर शेख यांनी खेळाडू व मार्गदर्शकांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. खेळाडूंना प्राचार्य नूर शेख,फिजिकल डायरेक्टर रमेश पटारे, व्हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, इसाक सय्यद, महेश गोंडे, सर्व हाऊस मास्टर्स आणि पर्यवेक्षिका ज्योती शेलार यांचे मार्गदर्शन लाभले.
हॉकी व व्हॉलीबॉलसह क्रिकेट, फुटबॉल आणि कुस्ती या खेळांमध्येही गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यंदा उल्लेखनीय यश मिळवले आहे. सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि संस्थेच्या प्रोत्साहनातून शाळेने क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवर्गात आनंदाचे वातावरण असून, राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेतही दोन्ही संघांकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
चौकट:- गौतम पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मिळविलेले उपविजेतेपद, तर हॉकीमध्ये दोन्ही गटांत विभागीय विजेतेपद मिळवून शाळेच्या क्रीडा परंपरेचा गौरव वाढविला आहे. गौतमच्या कल्याणी वावधनेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात झालेली निवड ही संपूर्ण गौतम परिवारासाठी अभिमानाची बाब आहे. खेळाडूंची जिद्द, प्रशिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि संस्थेचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन यामुळेच हे यश साध्य झाले आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरही गौतमचे खेळाडू यापुढेही अशीच उज्ज्वल कामगिरी करून गौतमचा आणि परिसराचा नावलौकिक वाढवत राहतील असा विश्वास आहे.- सौ.चैतालीताई काळे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!