Thursday, October 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedभूमिपूजन मोठ्या थाटात, मात्र दोन वर्षांपासून रस्ता रखडला!!-ज्येष्ठ नेते शरदराव थोरात यांची...

भूमिपूजन मोठ्या थाटात, मात्र दोन वर्षांपासून रस्ता रखडला!!-ज्येष्ठ नेते शरदराव थोरात यांची मागणी

कोपरगाव प्रतिनिधी

कोकमठाण येथील देवयानी डेअरी-कांचनवाडी ते कोकमठाण (ई.जि.मा. ५) या महत्त्वाच्या रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून रखडले असून, नागरिकांना दररोज गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे मोठ्या थाटामाटात भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, भूमिपूजनानंतरही रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी ज्येष्ठ नेते शरदराव थोरात यांनी केली आहे.
कोकमठाण, संवत्सर, सडे आणि परिसरातील इतर गावांतील नागरिकांसाठी कोपरगाव शहरात ये-जा करण्याचा हा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, व्यापारी तसेच वाहनधारक मोठ्या प्रमाणावर या रस्त्याचा वापर करतात. मात्र, रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना दररोज प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.सध्या रस्त्यावर केवळ खडी टाकून ठेवण्यात आली असून, प्रत्यक्ष काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करत प्रवास करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर चिखल आणि खड्डे निर्माण झाल्याने परिस्थिती अधिक बिकट होते. दुचाकीस्वारांचे अपघात होण्याची शक्यता वाढते, तर शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो. शेतमालाची वाहतूक करतानाही शेतकऱ्यांना अडचणी सहन कराव्या लागतात.महत्त्वाच्या रस्त्याचे भूमिपूजन करून दोन वर्षे उलटूनही काम पूर्ण होत नसेल, तर नागरिकांनी गैरसोय किती काळ सहन करायची, असा सवालही उपस्थित होत आहे. केवळ भूमिपूजन आणि घोषणांपुरते विकासकाम मर्यादित न राहता ते प्रत्यक्षात पूर्ण होणे आवश्यक आहे.संबंधित विभागाने या रस्त्याची तातडीने पाहणी करून रखडलेले काम सुरू करावे, दर्जेदार पद्धतीने ते निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावे आणि कामास विलंब होण्याची कारणे स्पष्ट करावीत. तसेच संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका तपासून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी शरदराव थोरात यांनी केली आहे.
नागरिकांची गैरसोय दूर करून सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने आता तरी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!