ज्येष्ठ नागरिकांच्या स्नेहमेळाव्याने जपली गावातील एकोप्याची परंपरा!!

जेऊर कुंभारी वार्ताहर
जेऊर कुंभारी येथील मारुती मंदिरात कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने गावातील ज्येष्ठ नागरिक एकत्र आले होते. स्नेहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमातून गावातील सामाजिक एकोपा, आपुलकी आणि परंपरेची जपवणूक अधोरेखित झाली.
कोजागिरी पौर्णिमा हा आनंद, उत्साह आणि स्नेहबंध दृढ करणारा सण म्हणून ओळखला जातो. या निमित्ताने मारुती मंदिरात एकत्र आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी एकमेकांशी संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला. धावपळीच्या जीवनात समाजातील ज्येष्ठांनी एकत्र येऊन असे सण साजरे करणे, ही गावाच्या सांस्कृतिक परंपरेला बळ देणारी बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली.
गावातील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन साजरी केलेली कोजागिरी पौर्णिमा हा केवळ सणाचा आनंद नसून गावातील जिव्हाळा, बंधुभाव आणि एकात्मतेचे प्रतीक ठरली.
या वेळी गावचे उपसरपंच जालिंदर चव्हाण, कोंडीराम वक्ते, रामभाऊ वक्ते, आप्पासाहेब वक्ते, भानुदास वक्ते, बारकू मेहेत्रे, विलास मेहेत्रे, दौलत सोळके, प्रदीप गायकवाड, सुनील वक्ते, संदीप वक्ते, राजेंद्र वक्ते, नामदेव वक्ते, मधुकर वक्ते, संदीप राऊत, गणेश पोटे, बंटी मेहेत्रे, गौरव आहिरे आदी उपस्थित होते.


