Wednesday, October 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचे आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत देण्याची...

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचे आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत देण्याची मागणी!!

जेऊर कुंभारी वार्ताहर

निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यावर अंकुश घालावा, तसेच दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटी व मित्रपक्षांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार प्रभुल्लिता सातपुते यांना सादर केले.
चालू हंगामात तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिकांच्या उत्पादनावर झालेल्या परिणामामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शेतीसाठी केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देत हेक्टरी एक लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
निवडणूक आयोगाच्या सध्याच्या कारभाराबाबत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला. निवडणूक प्रक्रियेदरम्यान तसेच प्रशासकीय कामकाजात होत असल्याचा आरोप करण्यात येणाऱ्या मनमानी कारभाराला आळा घालावा आणि सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना नाहक त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
या आंदोलनात कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष नितीन मनोहर शिंदे, किसान काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय सुधाकर जाधव, काँग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष नंदकुमार शिवरकर, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष सचिन कल्याणराव होन, संजय त्रिभुवन आणि राहुल गवळी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
तसेच मित्रपक्षांच्या वतीने कॉकरोच जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गायकवाड गट) यांच्याशी संबंधित दिलीप गायकवाड आणि अर्जुन मोरे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर योग्य कार्यवाही व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासन व प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी; अन्यथा आगामी काळात यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!