
कोपरगाव प्रतिनिधी
मातृत्वाचा सन्मान, आई आणि पाल्यांमधील स्नेहबंध अधिक दृढ करण्यासह भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित ‘मी अँड मॉम दांडिया स्पर्धा २०२६’ उत्साहात पार पडली. या सांस्कृतिक सोहळ्यात तब्बल १०० मातृ-पाल्य जोड्यांनी सहभाग नोंदविला. पारंपरिक वेशभूषा, दांडियाचा ताल आणि नृत्यातून व्यक्त होणाऱ्या मायलेकरांच्या प्रेमबंधामुळे शालेय परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले.इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत आई आणि पाल्यांच्या जोड्यांनी नृत्यकौशल्य, तालबद्धता, कल्पक हालचाली आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. उत्कृष्ट जोडी, नृत्यकौशल्य, पारंपरिक वेशभूषा, कल्पकता आणि सादरीकरणातील वैशिष्ट्यपूर्णता अशा विविध निकषांवर स्पर्धेचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामुळे सहभागी जोड्यांना आपापले कलागुण सादर करण्याची आणि वेगळेपण सिद्ध करण्याची संधी मिळाली.
स्पर्धेत शौर्य शर्मा व मोनिका शर्मा यांनी प्रथम क्रमांक, ध्रुव शर्मा व रविना शर्मा यांनी द्वितीय क्रमांक, तर कियांश बागरेचा व रूपाली बागरेचा यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या जोड्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. याशिवाय विविध निकषांनुसार प्रत्येक गटातून प्रत्येकी १३ विजयी जोड्यांची निवड करून त्यांनाही ट्रॉफी प्रदान करण्यात आली.या कार्यक्रमाला समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे यांची प्रमुख उपस्थिती होती. वृंदा पटेल आणि मोनिका पटेल यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. दांडियाच्या संकल्पनेवर आधारित आकर्षक आणि कलात्मक सजावटीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. नवरात्रोत्सवाच्या मंगलमय वातावरणाची अनुभूती देणारी सजावट आणि रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा यांमुळे सोहळ्याला विशेष रंगत आली.
स्वाती कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमातून शिक्षणासोबत संस्कार, सांस्कृतिक जाणीव आणि कौटुंबिक मूल्यांची जोपासना करण्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला, संस्कृती आणि पालकांच्या सहभागाला प्रोत्साहन देणारे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतात. आईसोबत नृत्य करण्याच्या या संधीमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले, तर मातांनाही आपल्या पाल्यांसोबत आनंदाचे अविस्मरणीय क्षण अनुभवता आले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कला शिक्षक विभावरी नगरकर, मंगेश गायकवाड आणि गोरख बोरसे यांच्यासह भक्ती बाभूळके, श्वेताली सदाफळ आणि सायली हराळे यांनी विशेष परिश्रम घेतले. स्मिता गुंजाळ आणि सुनैना शर्मा यांच्यासह विद्यार्थिनी सई भनगे व अलमिरा पठाण यांनी सूत्रसंचालन केले.मातृत्वाचा सन्मान, भारतीय संस्कृतीचा गौरव आणि आई-पाल्यांमधील नात्यांचा गोडवा जपणारा ‘मी अँड मॉम दांडिया स्पर्धा २०२६’ हा उपक्रम समता इंटरनॅशनल स्कूलच्या सांस्कृतिक आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या परंपरेतील एक संस्मरणीय सोहळा ठरला.


