Wednesday, October 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोपरगाव रेल्वे स्टेशनवर स्वतंत्र आरपीएफ ठाणे द्या!!-आ. आशुतोष काळेंची मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांकडे...

कोपरगाव रेल्वे स्टेशनवर स्वतंत्र आरपीएफ ठाणे द्या!!-आ. आशुतोष काळेंची मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांकडे मागणी

कोपरगाव प्रतिनिधी

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत येणाऱ्या लाखो साईभक्तांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी कोपरगाव रेल्वे स्थानकावर पूर्णवेळ स्वतंत्र रेल्वे सुरक्षा बलाचे ठाणे मंजूर करून तिथे रेल्वे पोलीस निरीक्षकांची तात्काळ नियुक्ती करावी अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.दिलेल्या निवेदनात आ. आशुतोष काळे म्हणाले कि, कोपरगावला ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभला असून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात देशभरातून साधू-संत आणि लाखो भाविक कोपरगावमार्गे शिर्डीला ये-जा करणार आहेत. साईनगर शिर्डी टर्मिनस स्थानकावर इंजिन बदलण्याच्या तांत्रिक मर्यादा असल्यामुळे मुख्य लाईनवरील अमृत भारत दर्जा प्राप्त असलेले कोपरगाव रेल्वे स्थानक या काळात मुख्य केंद्र ठरणार आहे. कुंभमेळ्यादरम्यान नाशिकमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांपैकी २५ टक्के भाविक शिर्डी व कोपरगाव परिसरातील देवस्थानांना भेट देतात. कुंभमेळा काळात शिर्डीत दररोज १.५ लाख भाविक तर कोपरगाव स्थानकावर दररोज १० ते १५ हजार प्रवासी येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ओळखून कोपरगाव स्थानकावर स्वतंत्र आरपीएफ ठाणे उभारणे अत्यंत गरजेचे आहे.
आ. आशुतोष काळे यांनी मार्च २०२७ पूर्वी आरपीएफ ठाणे उभारून तिथे १ पोलीस निरीक्षक, १ उपनिरीक्षक, १ सहाय्यक उपनिरीक्षक, १० हेड कॉन्स्टेबल आणि ११ कॉन्स्टेबल असे एकूण २४ जवान आणि याव्यतिरिक्त कॉन्स्टेबल संवर्गातील १५ कायमस्वरूपी पदे मंजूर करण्याची मागणी केली आहे. तसेच जवानांच्या राहण्यासाठी स्थानक परिसरात २० खाटांचे सर्वसोयीयुक्त स्वतंत्र निवासस्थान उभारण्यासाठी २.४ कोटी रुपयांचा प्रस्ताव मध्य रेल्वे प्रधान मुख्य अभियंत्यांकडे सादर करण्यात आला आहे.कुंभमेळा सुरू होण्यापूर्वीच नवनियुक्त आरपीएफ अधिकाऱ्यांना स्थानिक भौगोलिक परिस्थिती व कार्यपद्धतीचा अंदाज यावा यासाठी तात्काळ आरपीएफ ठाणे उभारण्याची मागणी आ. आशुतोष काळे यांनी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यामुळे कोपरगाव रेल्वे स्थानकाचा सुरक्षेचा दर्जा उंचावून भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होण्यास मदत होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!